Pandharpur Electric shock death: विजेचा शॉक लागून पती-पत्नी ठार

नदीवरील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा तीव्र शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला
Electric Shock
Electric ShockPudhari
Published on
Updated on

पंढरपूर : रात्रभर पाऊस सुरु असल्याने भीमा नदीवरील विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा विजेचा तीव्र शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भीमा नदीकाठी पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात दि. २९ रोजी पहाटे घडली आहे. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दाम्पत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही आपला जीव गमवावा लागला आहे. लक्ष्मण बाबू नागणे (वय ६०) आणि अलका लक्ष्मण नागणे (५५) अशी या मृत शेतकरी पती-पत्नीची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबे गावच्या परिसरात शेती पंपाची वीज पहाटे ४.४५ वाजता येते. रविवारी रात्रभर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदीवरील विजेची मोटार बंद करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण नागणे हे पहाटेच्या सुमारास गेले होते. मात्र, रात्रभर झालेल्या पावसामुळे तिथे वीज प्रवाहाचा बिघाड झाला होता. मोटार बंद करत असताना अचानक लक्ष्मण नागणे यांना विजेचा जोरदार शॉक लागला.

आपल्या पतीला विजेचा धक्का लागल्याचे आणि ते विव्हळत असल्याचे पाहून पत्नी अलका नागणे या घाबरल्या. पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्या तत्काळ त्यांच्या दिशेने धावल्या आणि त्यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाऊस आणि ओलाव्यामुळे वीज प्रवाह वेगाने पसरला. विजेचा धक्का अलका नागणे यांनाही बसला आणि त्याही जागेवर कोसळल्या. या दुर्दैवी अपघातात काही क्षणांतच शेतकरी पती-पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले, दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमकरीता पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news