पंढरपूर कॉरिडॉरमुळे विकासाला मिळणार गती

Corridor project: सर्वंकष विकासाने पंढरपूर धार्मिक पर्यटन केंद्र बनणार
Pandharpur Corridor development
पंढरपूर कॉरिडॉरमुळे विकासाला मिळणार गतीpudhari photo
Published on
Updated on
पंढरपूर : सुरेश गायकवाड

वाराणशी काशीच्या धर्तीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे सर्वंकष विकास आराखडा (कॉरिडॉर) राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या कामाच्या कार्यवाहीला गती देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून ‘गो अहेड...’ म्हणत प्रशासनाला कामाला लागण्याचे आदेश नुकतेच पंढरपूर दौर्‍यावर आले असता दिले आहेत. यामुळे पंढरपूर कॉरिडॉर होणार असून बाधितांना योग्य मोबदला देत कॉरिडॉर सर्वंकष करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरमुळे पंढरपूरच्या विकासात भर पडणार आहे. या कॉरिडॉरकडे पंढरपूरकरांसह भाविक, वारकर्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

पंढरपुरात वर्षेभरात भरणार्‍या कार्तिकी, चैत्री, आषाढी व माघी या चार मोठ्या यात्रा भरतात. तसेच महिन्याच्या व पंधरा दिवसाच्या एकादशीला देखील लाखो भाविक पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी येतात. विकेंड आणि दररोज येणारे हजारो भाविक पाहता भाविकांना अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध देणे गरजेचे आहे. याकरिता कॉरिडॉर होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे. यामाध्यमातून वारकर्‍यांची वारी सुखकर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरातील कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

त्यामुळे मंदिर परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर केंद्र बिंदू मानून कॉरिडॉर राबविण्यात येणार आहे. या पंढरपूर विकास आराखड्यामध्ये (कॉरिडॉरमध्ये) अनेक निवासी मालमत्ता, यावसायिक आस्थापना, ऐतिहासिक मठ अशा मालमत्ता बाधित होणार आहेत. मात्र, याकरिता नुकसान भरपाईची ही तरतूद करण्यात आली आहे. राज्यात आत्तापर्यंत दिला गेला नसेल इतका मोठा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे जागा संपादित करण्याच्या कामात अडथळे येणार नाहीत, असे प्रशासनाचे मत आहे. कोणालाही अंधारात न ठेवता आराखडा समजावून सांगितला जाणार आहे. कोणाचेही हिरावून घेतले जाणार नाही. चैत्री यात्रा सोहळा संपल्यानंतर जिल्हा प्रशासन पंढरपूर कॉरिडॉरवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे.

या विकास आराखड्यानुसार शहरातील रस्ते व प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार, अद्ययावत वाढीव वाहन तळे व त्यांचा विकास, दर्शन मंडप, स्काय वॉक उभारणी, घाट बांधणी, उद्यान विकास, हेलिपॅड ची उभारणी, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, भूमिगत गटार योजना, भूमिगत विद्युतीकरण, स्नान ग्रह, शौचालय उभारणी, चेंजिंगरूम, वारकरी निवारा केंद्र, अग्निशमन केंद्र, रेडिओ केंद्र, ट्रामा केअर सेंटर, संत पीठ, पालखी तळ विकास, 65 एकर परिसर विकास आदी कामांबरोबर इतर ही विकास कामे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध नाही. मात्र, कॉरिडॉरमूळे आमचे दुकान बाधित होत आहे. व्यवसाय संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आम्हाला दुकानाच्या बदल्यात दुकान आणि मोबदला मिळाला पाहिजे. विकासाला आमचा विरोध असणार नाही, असे मत नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बाधित होणार्‍या दुकानदाराने सांगितले.

मंदिर परिसरात होणारी कामे

मंदिर परिसरात दर्शन व्यवस्था हॉल, भजन, कीर्तन हॉल, दोन मजली शॉपिंग सेंटर, बहुउद्देशीय हॉल व संत साहित्य ग्रंथालय, प्रशासकीय इमारत, वाहनतळ, स्कायवॉक, दर्शन मंडप, घाट बांधणी कामे प्रस्तावित आहेत.

पंढरपूरकरांसाठी कॉरिडॉर फायद्याचा

पंढरपूर येथे येणार्‍या भाविकांची वाढती संख्या पाहता शासनाने पंढरपूर कॉरिडॉर राबविण्याचे धोरण आखले आहे. कॉरिडॉर हा येणार्‍या भाविकांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच विकास आराखडा राबविताना बाधित होणार्‍या मालमत्तांना जास्तीत जास्त मोबदला मिळणार आहे. बाधितांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार आहे. कॉरिडॉरमुळे पंढरपूरला भाविकांची संख्या वाढणार आहे. यामुळे पंढरपूर हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येणार आहे. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news