Pandharpur Corridor Project| पुनर्वसनानंतरच कॉरिडॉरचे काम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा
Pandharpur Corridor Project
Pandharpur Corridor Project
Published on
Updated on

सुरेश गायकवाड

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतरच हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा शनिवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने, प्रभावती बाबासाहेब माने यांच्यासमवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत कमी जागा आहे. आता मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय चार पटीने वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यावेळी वारीने एक नवा उच्चांक गाठला आहे. यावर्षी २५ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची दर्शनासाठी रांग लागली. परंतु, दर्शनासाठी २५ तास लागले तरीही कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठलनामाचा गजर करत हे दर्शन घेत आहेत. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटात अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा, विष्ठा आदी संपूर्ण स्वच्छता झाली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आपण सर्वजण करत असलेली सेवा श्री विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल, अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो. प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले.

मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी (मु. पो. गौरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) बाबासाहेब माधव माने आणि सौ. प्रभावती माने या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला. तसेच, एस.टी. महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एस.टी. प्रवास पास मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news