

पंढरपूर : उजनी धरणातून बुधवारी सकाळी १ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात आला तर वीर धरणातून १४ हजार ७४९ चा विसर्ग सुरु होता. त्यामुळे भीमा (चंद्रभागा ) नदीकाठी पूरस्थितीची भीती होती.
मात्र, सायंकाळी ६.३० वाजता उजनीचा विसर्ग कमी करुन ५० हजार क्युसेक तर वीरचा विसर्ग ५ हजार ६०९ क्युसेक करण्यात आला आहे. विसर्ग निम्म्याने कमी करण्यात आला असला तरी पंढरपुरात दाखल झालेला विसर्ग कायम असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. गुरुवारी सायंकाळी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीत १ लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. तर वीरमधून १४ हजार ७४९ असा एकूण १ लाख १४ हजार ७४९ क्युसेकचा विसर्ग सुरु आहे. या विसर्गामुळे चंद्रभागा दुथडी भरुन वाहत आहे. नदी इशारा पातळीवरुन धोक्याच्या पातळीवर जाऊ लागली आहे. भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे पंढरपूर, विष्णूपद, मुंढेवाडी, गुरसाळे, कौठाळी, पिराची कुरोली, पुळूज, आव्हे हे ८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
तर चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने दिलेला वेढा कायम आहे. त्यामुळे पंढरपूर येथे नदीच्या घाटांना पाणी लागलेले आहे.
बाधित शंभर कुटुंबे परतणार घरी
व्यासनारायण व अंबिका नगर झोपडपट्टीतील शंभर कुटुंबांचे प्रशासनाने रायगड भवन येथे स्थलांतर केले आहे. या कुटुंबांना मंदिर समितीकडून जेवण पुरवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून चंद्रभागेचे पाणी वाढत आहे, तसे कमी देखील होत आहे. त्यामुळे पूरबाधित लोक कधी घरात तर कधी घराबाहेर वास्तव्य करताना दिसत आहेत. मात्र, गुरुवारी पुराचे पाणी कमी होत असल्याने सायंकाळी हे बाधित कुटुंबे आपापल्या घरी परतण्याची आशा आहे.