

पंढरपूर : राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने पंढरपुरात राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक बांधले. परंतु या बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भाविकांना, प्रवाशांना सेवा-सुविधा मिळत नाहीत. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. असे असतानाही या बसस्थानकाकडे मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर येथील बसस्थानकास भेट दिली होती. यावेळी त्यांना घाणीचे साम्राज्य दिसून आले. प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी आगार प्रमुखांना स्वच्छता ठेवा व प्रवाशांना सुविधा द्या, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केले. याची गंभीर दखल घेऊन प्रताप सरनाईक यांनी आगार प्रमुखास निलंबित केले आहे. या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळामध्ये खळबळ उडाली आहे.
पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे याठिकाणी राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्वात मोठे 28 प्लॅटफॉर्म असलेले बसस्थानक बांधले आहे. याठिकाणी दररोज एसटीच्या सुमारे 300 ते 400 फेऱ्या होतात. तसेच 30 हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येतात. यामुळे याठिकाणी बसस्थानकात स्वच्छता व भाविकांना, प्रवाशांना सुविधा मिळणे गरजेचे आहे.
मात्र, याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरातून आलेले भाविक अस्वच्छता दिसत असल्याने पंढरपूरविषयी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर बसस्थानकास अचानक भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी प्रवासी व भाविकांतून होत आहे.
प्रवेशद्वारात अस्वच्छता, दुचाकींची गर्दी
बसस्थानकात प्रवाशांना प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या तीनही प्रवेशद्वारांना संतांची नावे देण्यात आलेली आहेत. मात्र, या प्रवेशद्वारातच कचरा, तंबाखू, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांनी प्रवेशद्वारात घाण साचत आहे. तर प्रवेशद्वारातच आणि समोरील गाळेधारकांच्या दुकानांच्या समोरच दुचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करताना अडथळ्याचे ठरत आहे. तर गाळेधारकांच्या दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील स्वच्छता कायम ठेवावी आणि वाहनांची सोय पार्किंगमध्ये करण्यात यावी, अशी मागणी गाळेधारकांकडून करण्यात येत आहे.