

पंढरपूर : उजनी धरणातून सोडण्यात आलेला 70 हजाराचा विसर्ग कमी करुन 30 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागेचा पुराचा धोका टळला आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे उघडे होऊ लागले आहेत. असे असले तरी चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा अद्याप कायम आहे.
नीरा व भीमा खोर्यात पर्जन्यमान कमी होऊ लागले आहे. त्यामुळे धरणात येणारा विसर्गदेखील कमी झाला आहे. त्यामुळे उजनी धरणामधून भीमा नदीत सुरू असलेला विसर्गदेखील 30 हजारावर करण्यात आला आहे. तर वीरचादेखील विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर येथे 50 हजाराचा विसर्ग सुरू आहे. विसर्ग कमी होऊ लागल्यामूळे पंढरपूर येथील संभाव्य पुराचा धोका टळला आहे. तसेच कोल्हापूर पद्धतीचे उंबरे, आव्हे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, विष्णूपद, अजनसोंड, बठाण हे आठही पाण्याखाली गेलेले बंधारे उघडे होऊ लागले आहेत.
भीमा खोर्यातील पावसाची संततधार कमी झाली आहे. त्यामुळे उजनी धरणात येणारा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत सुरू असलेला 70 हजाराचा विसर्ग कमी करुन 30 हजार क्युसेक करण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत 20 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. यात आणखी विसर्ग कमी होणार असल्याने पाणी पातळीदेखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भीमेला (चंद्रभागा) नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगायला हवी होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. कारण पंढरपूर येथील जुन्या दगडी पुलावर नागरिक स्नान करताना तसेच मासेमारी करताना आढळून येत आहेत. पुलाचे काही कठडे उघडे होऊ लागले आहेत. या कठड्यांवर बसून मासेमारी सुरू आहे. याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.