Pandharpur Ashadhi Yatra: गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता; संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला अशा जयघोषात गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली
Pandharpur Ashadhi Yatra: गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची सांगता; संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला
Published on
Updated on

पंढरपूर : गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला अशा जयघोषात गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या. तेथे मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला. गोपाळकाल्याने आषाढी यात्रेची खऱ्याअर्थाने सांगता झाली, असे मानले जाते.

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथे मानाची अंमळनेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे ४ वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे पहाटे ५ वाजता, तसेच सकाळी ९ वा. श्री संत तुकाराम महाराजांची, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गोपाळपुरात आली. पहाटेपासूनच सुमारे ५०० संतांच्या दिंड्या, पालख्या दाखल झाल्या. सकाळी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तसेच श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन केल्यावर मंदिराजवळ पालख्या विसावल्या.

गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात पहाटे २.३० वाजता प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यानंतर पहाटे ३.३० वाजता श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी श्री गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली. एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली. श्रीकृष्ण मंदिर समितीने प्रसाद म्हणून लाह्यांच्या काल्याचे वाटप केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news