

सोलापूर : पंढरपूर कॉरिडारसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत इतिवृत्ताला मंजुरी मिळाली असून, आता तीन हजार 993.90 कोटीतून कॉरिडारची कामे होणार आहेत. भूसंपादनासासाठी 2 हजार 26 कोटी 72 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर भक्तांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ऐन वारी काळातही फक्त सहा तासांत दर्शन होईल, असे नियोजन केल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
यासंदर्भात पुढील आठवड्यात शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतर 30 टक्के निधी त्वरित मिळेल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, निधी प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाच्या कामास सुरुवात होईल. पुढील पन्नास वर्षांतील वारकऱ्यांची पंढरीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कॉरिडॉरची कामे केली जाणार आहेत.
पंढरीतील पुरातन मंदिराचेही जतन आणि संवर्धन केले जाणार आहे. स्वच्छ, गर्दीमुक्त, अध्यात्मयुक्त, समाधानकारक अनुभूती देणे हे कॉरिडॉरमध्ये होईल. कॉरिडॉरमुळे बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करणे, बाधित व भाडेकरूंना योग्य मोबदला देणे या कामास प्राधान्य देऊन कामे केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
एकाचवेळी उतरतील तीन हेलिकॉप्टर
कराड नाका लगत कृषी आणि जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवर नवीन पालखी तळ होणार आहे. या पालखी तळावर एक हेलिपॅड तयार केले जाणार असून, पंतप्रधान, राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरू शकतील अशा सुविधेचे हे हेलिपॅड असेल. एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर उतरतील, अशी सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
ही होणार कामे
पंढरपूर शहराला जोडणारे नवे 22 मार्ग विकसित केले जाणार
कॉरिडॉरमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना खालील बाजूस व्यापारी गाळे तर त्यावरील बाजूस प्रशासकीय कार्यालयांना जागा देणार
488 व्यापारी गाळ्यांचे संकुल नव्याने उभारणार
त्यामध्ये संतपीठ, व्हीआयपी रूम, सुरक्षा, वैद्यकीय केंद्र उभारली जाणार
2.2 किलोमीटर लांबी आणि 15 मीटर रुंदीचा नगर प्रदक्षिणा मार्ग विकसित होणार
वयस्कर वारकऱ्यांसाठी उजैनच्या धर्तीवर नदीकाठी स्नान कुंड उभारणार
435 चारचाकी, 800 दुचाकी क्षमतेचे वाहनतळ निर्माण करणार
नगरपरिषदेची जुनी इमारत, लोकमान्य विद्यालय, नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक सहाचे जतन आणि संवर्धन होणार
पंढरपूर परिसरात 15 स्वागत कमानी उभारणार
यमाई तलावाचे सुशोभीकरण होणार
जुन्या दगडी पुलाशेजारी नवीन दगडी पूल होणार