

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटाची स्वच्छता करण्याची विशेष मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूला असलेली झुडपे, राडारोडा व कचरा पूर्णपणे काढून सपाटीकरण करावे, नदीकाठाच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता करावी. वारी पूर्वी संपूर्ण वाळवंट स्वच्छ करण्याबरोबरच संपूर्ण यात्रा कालावधीत व त्यानंतरही वाळवंटात भाविकांची गर्दी असेपर्यंत स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
नदीपात्रात प्लास्टिक व इतर कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या कचरा कुंड्यांची व्यवस्था करावी, तसेच वाळवंटाच्या सफाईसाठी स्वतंत्र ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. वाळवंटाच्या प्रत्येक भागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून वाळवंट कायम स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना विविध भाग वाटून देण्यात आले असून, सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंटाची स्वच्छता करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सफाई कर्मचारीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. वारीपूर्वी वाळवंटाची झालेली स्वच्छता पाहून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.