

पंढरपूर : पंढरपूर-कराड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे. यातच या रस्त्याचे नव्याने रुंदीकरण डांबरीकरण झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहने ये जा करत आहेत. परंतु, या रोडवर टाकळी बायपास व कोर्टी हद्दीत सिंहगड कॉलेज कॅम्पससमोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रातोरात उभारण्यात आलेले गतीरोधकामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. या गतीरोधकावर पांढरे पट्टे ओढले नाहीत.
तसेच रिफ्लेक्टर बसवण्यात आले नसल्याने वाहनधारकांना गतीरोधक दिसून येत नाही. त्यामुळे वाहने गतीरोधकावर आदळत आहेत. या गतीरोधकामूळे नवीन वाहन चालकांच्या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तर अनेक दुचाकीस्वारांचे अपघात घडले आहेत. यामुळे या गतीरोधकांवर पांढरे पट्टे तसेच रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरीला चारही बाजूंनी मोठ्या रस्त्यांनी जोडलेले आहे. त्यामुळे पंढरपूरला धार्मिक पर्यटन करण्यासाठी दररोज हजारो भाविक वाहनांमधून ये जा करतात. पंढरपूरला आलेला भाविक हे एका दिवसात पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, कोल्हापूर अशी तीर्थक्षेत्र भेटीची पर्यटन वारी करत आहेत. त्यामुळे भाविकांच्या वाहनांना गती असते. त्यामुळे महत्त्वाची गावे, चौक, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी रस्त्यावरुन वाहने वळतात, नागरिक, विद्यार्थी ये जा करतात. म्हणून तेथे अपघात होऊ नयेत म्हणून गतीरोधक बसविण्यात आले आहेत. हे एक प्रकारे चांगले झाले आहे.
मात्र, रातोरात तयार करण्यात आलेले हे गतीरोधक वाहनधारकांना लक्षात येत नाही. कारण या गतीरोधकांवर लक्षवेधक पांढरे पट्टे ओढलेले नाहीत. तसेच गतीरोधकावर रात्रीच्यावेळी रस्त्यावर वाहनांच्या प्रकाशझोतात दिसेल, असे रिफ्लेक्टर देखील बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी व मोठ्या वाहनांचे अपघात घडत आहेत. मात्र, या अपघातांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहेत.
दरम्यान, ज्या लोकांचे येथे अपघात घडले आहेत. तसेच जे लोक येथून येवून गेले आहेत. त्यांना येथे गतीरोधक असल्याचे माहिती झाले आहे. मात्र, नवीन वाहनधारकांना येथे गतीरोधक बसविण्यात आल्याचे दिसून येत नाही. डांबरी रस्ता असल्यामुळे रस्ता आणि गतीरोधकाचा रंग एकसारखाच दिसत असल्याने वाहनधारीकांची गफलत होत आहे.