Dr. D.Y. Patil: प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील

शिक्षणसम्राट म्हणून सर्वांना परिचित असलेले डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे
Dr. D.Y. Patil
Dr. D.Y. Patil
Published on
Updated on

सोलापूर : शिक्षणसम्राट म्हणून सर्वांना परिचित असलेले डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. त्यांचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रात काम करून जास्तीत जास्त मुलांना शिकवावे, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, अशा भावना सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक, राजकीय मान्यवरांनी व्यक्त केल्या...

लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. विशेषतः अभियांत्रिकी व उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. त्यांचे कार्य महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी राहील. डॉ. डी. वाय. पाटील हे आमचे निकटचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या निधनाने आम्हाला वैयक्तिक दुःखही झाले आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करताना ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण प्रार्थना.
- प्राचार्य जयप्रकाश बिले, अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, करमाळा.
डॉ. डी. वाय. पाटील यांना भेटण्यासाठी तत्कालीन माजी आ. कै. विठ्ठलभाऊ शिंदे यांच्यासोबत मी कोल्हापूरला १९७४ साली त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होत की आमदार, खासदार मंत्री ही पदं येतात जातात. या पदापेक्षा तुम्ही सर्वांनी बहुजनांची मुले शिकलेली नाहीत, त्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्यास शैक्षणिक संस्था काढा, शिक्षण क्षेत्रात काम करा. त्यांनी जे शब्द कोल्हापूर भेटीत बोललेे होते, ते त्यांनी खरे करून दाखवले. आज देशात डी. वाय. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रात नाव आघाडीवर आहे. त्यांचा आदर्श घेऊन शिक्षण क्षेत्रात काम करून जास्तीत जास्त मुलांना शिकवावे, हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- विनायकराव पाटील, माजी आमदार, माढा तालुका
महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची वार्ता कळाली अन्‌ धक्काच बसला. डी.वाय. दादांचा खूप जुना, दीर्घकाळापासून स्नेहबंध होता. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या उभारणीपासून आतापर्यंत त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आमच्या बोलण्यात नेहमीच अन्नछत्र मंडळ, लतादीदी, भारतीय व परदेशी शिक्षण असे विषय चर्चेत असायचे. डी.वाय. दादांच्या जाण्याने अन्नछत्र मंडळ न्यासाची अपरिमीत हानी झाली आहे. त्यांनी सर्वसामान्य भक्तांबरोबर रांगेत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. दिवंगत डी.वाय. दादांना लाखो स्वामीभक्तांकडून, अक्कलकोटवासियांकडून आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यास, अक्कलकोट
शिक्षणतज्‍ज्ञ, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्रात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या नावाने राज्यात अनेक महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालये उभी राहिली. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जात होते. त्यांनी तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
- प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, दूरदर्शी विचारवंत आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने देशाने शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन ही केवळ एका महान शिक्षणतज्ज्ञाची हानी नसून, भारतीय शिक्षण क्षेत्राची भरून न निघणारी हानी आहे.
- प्रा. रामदास झोळ, संस्थापक, अध्यक्ष, दत्तकला शिक्षण संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news