

सोलापूर : राज्य पोलीस दलातील विविध पदांसाठी 15 हजार 631 पदांची भरती होणार आहे. यासाठी पाच लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. 11 फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी सुरू होणार आहे. त्यामुळे या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा सध्या सराव सुरू आहे.
पोलिस वर्दीचे स्वप्न पाहणार्या राज्यातील तरुणांसाठी गृह विभागाने 15 हजार 631 पोलिस शिपायांच्या मेगा पदभरतीची प्रक्रिया सुरू केली. 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची शेवटी तारीख होती. ती वाढवून सात डिसेंबर करण्यात आली होती. परंतु नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमुळे भरतीची प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडत आहे. आता शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांमधून एका पदासाठी दहा जणांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात येईल. त्यानंतर लेखी परीक्षेतील गुणांच्या मेरीटनुसार पदभरती होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पोलिस भरतीची शारीरिक चाचणी परीक्षा लगेच 11 तारखेला सुरू होईल की नाही याची शाश्वती नाही. याबाबत गृह विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, एकंदरीच निवडणुकांचा माहोल पाहता भरती प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बर्याच कालावधीनंतर पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने वयाची मर्यादा ओलांडणार्या युवकांमध्ये धाकधुक आहे. सातत्याने भरती लांबणीवर पडत असल्याने युवकांचे सरावातील सातत्य राहात नाही. त्यामुळे भरती लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वर्षभरातील रिक्त पदांवर भरती
पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्डसमन, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या काळात रिक्त होणारी पदे भरली जाणार आहेत. यामध्ये पोलिस शिपाई 12 हजार 399, चालक शिपाई 234, सशस्त्र पोलिस शिपाई दोन हजार 393, कारागृह शिपाई 580, बॅण्डसमन 25 या पदांसाठी ही भरती होत आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीणसाठी 90, सोलापूर शहर पोलिसांसाठी 96, तर राज्य राखीव पोलिस दल कारागृह शिपाई यांची सुमारे 55 पदे आहेत.