

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्याची आढावा बैठक घेऊन चार हजार कोटींचा निधी कोठे गेला याची चौकशी करणार आहे. जास्त आगाऊपणा केल्यास मोहोळ तालुक्यातील अनगर माढा तालुक्याला जोडू, असा इशारा नूतन आमदार राजू खरे यांनी दिला.
तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांचे आभार मानले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मोहोळमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकास भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी समाजातील नागरिकांनी आमदार राजू खरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार खरे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकास आवश्यक निधीची पूर्तता करण्यात येईल. मोहोळ तालुक्यामध्ये दलित वस्तीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. इंदापूरचे पार्सल इंदापूरला पाठवल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले. लवकरच मुलींसाठी मोहोळ तालुक्यामध्ये मोठे विद्यालय सुरू करणार आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत कसबे, मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, मंगेश पांढरे, भीम टायगर सेनेचे लखन घाटे, नागेश क्षिरसागर, शिवरत्न गायकवाड, अविनाश क्षीरसागर, जय महाराष्ट् प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी देशमुख, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, शिवरत्न गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.