

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्तीदेवता श्री तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांमूळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचत असल्याचे लक्षात घेऊन या निर्माल्याचा योग्य व पवित्र उपयोग करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने नुकताच घेतला आहे.
या उपक्रमातंर्गत श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आलेली फुले नियमितपणे गोळा करण्यात येत असून ही फुले सेंद्रिय पद्धतीने वाळवून त्यांची बारीक पावडर तयार केली जात आहे. त्यानंतर या पावडरमध्ये सेंद्रिय घटक व आवश्यक नैसर्गिक तेल मिसळून पूर्णतः रसायनविरहित अगरबत्ती तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे निर्माल्याचे पावित्र्य अबाधित राहात आहेच, शिवाय पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.गेल्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील घटस्थापनेच्या दिनी मंदिर संस्थानच्या वतीने तयार करण्यात आलेली सेंद्रिय अगरबत्ती भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे.भाविकांना मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रावरही ही अगरबत्ती खरेदी करता येणार आहे.
अगरबत्तीबरोबरच धूप, ऊद तसेच हवन कप देखील विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.हे सर्व उत्पादने रसायनमुक्त असून पूर्णतः सेंद्रिय असल्याने आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा धराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली व फुलकारीचे विवेक कानडे यांच्या सहकार्यातून सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.मंदिर संस्थानच्या स्वच्छता विभागामार्फत हा उपक्रम राबवला जात असून स्वच्छता निरीक्षक सुरज घुले हे या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमामुळे निर्माल्य व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि धार्मिक पावित्र्य यांचा सुंदर संगम साधला गेला आहे.