Organ Donation Day : त्वचा दानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची मरण यातना कायम

अवयव दान दिन विशेष
Organ Donation Day |
Organ Donation Day : त्वचा दानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची मरण यातना कायम File Photo
Published on
Updated on
श्रीनिवास बागडे

सोलापूर : जिवंत असताना व मृत्यूनंतर आपल्या शरीराचे अवयव दान करून ‘मी मरेन पण अवयवरूपी उरेन’ हा निर्धार आता सर्व पातळीवर होण्याची गरज निर्माण झाली आहे. शरीराचे अनेक अवयव दान होऊ शकतात. सर्वाधिक गरज मूत्रपिंडांची आहे, त्या अनुषंगाने रुग्णाचे परिवारच दाते म्हणून पुढे येऊ लागले आहेत. मात्र त्वचा दानाबाबतच्या जागृतीअभावी या रुग्णांना मरण यातनेतून मृत्यूला सामोरे जावे लागते आहे.

देशात प्रत्यारोपणासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे दोन लक्ष मूत्रपिंडांची गरज असते, त्यापैकी सध्या 6000 पेक्षा जास्त मूत्रपिंडे उपलब्ध होऊ शकत नाहीत. 30000 यकृतांची गरज आहे, मात्र केवळ 1500 यकृतेच उपलब्ध होऊ शकतात. 50 हजार हृदयांची गरज आहे, मात्र केवळ 100 हृदयेच उपलब्ध होतात. 1 लक्ष डोळ्यांच्या गरजेपैकी 25 हजारपेक्षा जास्त नेत्र उपलब्ध होऊ शकत नाहीत. हे सर्वसाधारण गरज निर्माण झालेले अवयवय असले तरी त्वचेच्या दानाबाबत जागृतीचा अभाव दिसून येतो. अनेक घटनांतील जळीत प्रकरणात तसेच अन्य रोगांमुळे रुग्णाच्या शरीरावरील त्वाचा नाहीशी होते. त्याचे बाह्यरूप विद्रुप होते. अशा रुग्णांवर त्वचेचे प्रत्यारोपण केल्यास त्याचे शरीर पूर्व स्थितीत येऊ शकते. त्यामूळे त्वचा दानालाही अन्यसाधारण महत्व आले आहे.

40 ते 45 टक्के भाजलेल्या रुग्णाला त्वचा दानाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. महाराष्ट्रात सांगलीत रोटरी स्किन बँक, मुंबईत लोकमान्य टिळक मेडीकल कॉलेज व सायन हॉस्पिटल, नाशिकमध्ये रोटरी वेदांत स्किन कलेक्शन तसेच पुण्यात सुयश हॉस्पिटल स्किन बँक याठिकाणी दानातून मिळालेली त्वचा जमा केली जाते. साधारण पाच वर्षापर्यंत त्वचा जपून ठेवली जात असलीतरी त्वचा दानाची टक्केवारी अगदीच नगण्य आहे. त्यामुळे त्वचेची गरज असलेल्या रुग्णाला अनेक महिने रुग्णालयात पडून रहावे लागते अथवा मृत्यूला कवटाळावे लागते. असे राज्यात जवळपास 26 हजार रुग्ण विविध रुग्णालयात पडून आहेत.

सोलापुरात 850 रुग्ण त्वचेच्या प्रतीक्षेत

विविध आजाराने व जळीत घटनेतून सोलापूरच्या विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास 850 इतकी आहे. या रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणाची अत्यंत गरज आहे. मात्र ती उपलब्ध होत नसल्याने त्यांना बर्न विभागात यातना सहन करत पडून रहावे लागत आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात त्वचा दानाबाबतही व्यापक जागृतीची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्वचा व नेत्रदानासाठी ‘रिट्रायव्हल कीटसह प्रशिक्षित तज्ज्ञ असणे गरजेचे आहे. त्यामुळे या दोन्ही अवयवाच्या दानाबाबत सोय होईल. परिणामी दात्यांच्या संख्येत निश्चित वाढ होईल. याबाबत अवयवदान व देहदान महासंघाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. अवयवांची उपलब्धता व गरज यामधील दरी कमी करण्यासाठी झटून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-सुनील देशपांडे, उपाध्यक्ष, अवयवदान व देहदान महासंघ, मुंबई
अवयवदानातून एक व्यक्ती आठ जणांना जीवदान देऊ शकते. आयएमए व शासनाच्या अवयवदान व देहदान चळवळीला सामाजिक स्तरावर चांगला पाठिंबा मिळत आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सर्व धर्माच्या धर्मगुरुंनी योगदान देणे गरजेचे आहे. अशा लोकांनीही ब्रेन डेड झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
- डॉ. संतोष कुलकर्णी, अवयवदान जनजागृती समिती महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news