

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या पाचही विभागतील आरपीएफ पोलिसांनी ’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्यांत एक हजार 99 मुलांची सुटका केली. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र व प्रवाशांच्या सुरक्षेची जाबाबदारी आहे. या शिवाय 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडतात.
मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, पुणे, भुसावळ आणि नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत गेल्या 11 महिन्यांत रेल्वेस्थान, प्लॅटफॉर्म, रेल्वे बोगी या ठिकाणांतील एक हजार 99 मुलांची सुटका केली आहे. यात 740 मुले आणि 359 मुलींचा समावेश आहे. या सर्व मुलांना बोलते करून त्यांच्या पालकांचा चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही भरकटलेली मुले गुन्हेगारीकडे वळण्याआधीच पालकांचा शोध घेऊन या मुलांचे पालकांशी पुनर्मिलन घडवण्यात येते.
नोव्हेंबरमध्ये सुटका करण्यात आलेल्या मुलांची संख्या 124 होती, ज्यामध्ये 78 मुले आणि 46 मुलींचा समावेश आहे. त्या तुलनेत जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत सुटका/पुनर्मिलन करण्यात आलेल्या मुलांची संख्या एक हजार 53 जणांचा समावेश आहे. यात 741 मुले आणि 312 मुलींचा समावेश आहे.
भरकटून वाट चुकलेला, वाईट संगतीने पालकांपासून दुरावलेला... संताप वा घरून भांडून किंवा कौटुंबिक समस्या, शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात ही मुले आपल्या कुटुंबीयांना न सांगता विविध रेल्वे स्थानकांवर भेदरलेल्या अवस्थेत ही मुले आरपीएफ जवानांना आढळतात. या मुलांशी प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी जवळीक साधून त्यांच्या समस्या समजून घेतात. या भरकटलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन यांचे पालकांशी पुनर्मिलन घडवू आणत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आरपीएफद्वारे केले जात आहे.
विभाग मुले मुली एकूण
मुंबई विभाग 242 137 379
भुसावळ मंडळ 141 106 247
पुणे विभाग 211 35 246
नागपूर विभाग 107 61 168
सोलापूर विभाग 39 20 59