

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय समाजातील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसह या घटकांसाठी असलेल्या आश्रम शाळेतील कर्मचार्यांचे प्रश्न सुटण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जिल्हा स्तरावर इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सुरू केले. मात्र, या बहुजनांचे कल्याण करणार्या कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी काम करत आहेत. कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे अनेकांचे काम प्रलंबित राहिल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात इतर मागास बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचा विकासासाठी शासनाने इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाची स्थापना केली. जिल्हा स्तरावर सहायक संचालक दर्जाच्या अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली कार्यालयही सुरू केले. हे कार्यालय पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचार्यांची नियुक्ती होणे गरजेची आहे. पण, एक निरीक्षक आणि एका वरिष्ठ लिपिकावर या दोनच कर्मचार्यांवर जिल्ह्यातील लाखो इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांचे काम येथील कार्यालयात चालते. या कार्यालयाचे आस्थापना प्रमुख असलेल्या सहाय्यक संचालक मनीषा फुले यांच्याकडे पुणे कार्यालयाचा नियमित पदभार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडेच आश्रता सोलापूरचा प्रभारी पदभारही दिल्याने ही कामे होण्यास वेळ लागत आहे. एकाच कर्मचार्यांवर अनेक अतिरिक्त कामाचा भार दिल्याने कामे होण्यास वेळ लागत आहे. जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजाला विकासाच्या वाटेवर आणणारे जिल्हा कार्यालय सलाईनवर आहे. कारण एकही प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे वेळेवर जात नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. येथील कार्यालयाला बळकटीकरणाची गरज आहे. प्रत्येक टेबलवर कर्मचारी असतील तरच या कार्यालयाचा हेतू सफल होणार आहे.