

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या बारा वर्षांत 79 बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल केले. चालू आर्थिक वर्षात आरोग्य विभागाला फक्त सहा बोगस डॉक्टर आढळले. बोगस डॉक्टरांवरील कारवाई संथगतीने होत असल्याने अधिकारी आणि बोगस डॉक्टरांचे काही लागेबांधे तर नाहीत ना, अशी चर्चा होत आहे.
राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची कबुली आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली. तरीही सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास चालू वर्षी फक्त सहा बोगस डॉक्टर सापडले. त्यामुळे त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. जिल्ह्यातील अनेक गावात सध्या बरेच बोगस डॉक्टर रुग्णावर उपचार करत आहेत. मात्र, त्याकडे आरोग्य विभाग डोळेझाक करत असल्याची चर्चा आहे.
आरोग्य विभाग करतोय काय...
आरोग्य विभागाकडून सन 2015-16 मध्ये 37 बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करून मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांविरुद्ध एखादाही मोठी कारवाई झाली नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग नेमके करतो तरी काय, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
गुन्हे दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांची संख्या
अक्कलकोट - 12, बार्शी - 11, करमाळा - 9, मोहोळ - 2, मंगळवेढा - 4, माढा - 7, माळशिरस - 5, सांगोला - 10, पंढरपूर - 4, दक्षिण सोलापूर - 14, उत्तर सोलापूर - 1