Onion Price Hike: अबब... कांदा ५० रुपये किलो!

बाजारात कांदा भाव खातोय; अन्य भाजीपाला मात्र स्वस्त
Onion Price
Onion Price Pudhari
Published on
Updated on

सोलापूर : बाजारपेठेत गेल्या आठवडाभरात कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदा सध्या ५० रुपये किलोने विकला जात आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर २५ ते ३० रुपये होते. कांद्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट काहीसे वाढले आहे.

एकीकडे कांद्याचे दर वाढले तर बहुतांश भाजीपाल्याचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. मेथी २० रुपये पेंडी, पालक १० रुपये, चुका १० रुपये पेंडी, बटाटे २० रुपये किलो, भेंडी ४० रुपये, शिमला मिरची ४० रुपये, वांगी ५० रुपये किलो दराने विकली जात आहेत. शेवगा २० रुपये, पुदिना १० रुपये, कोथिंबीर ५ रुपये पेंडी मिळत आहे. हिरवी मिरची ६० रुपये किलो आहे. अद्रक २०० तर लसूण १८० रुपयाने विकले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मागणी वाढल्याने कांद्याला भाव

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. १) १२ हजार १२८ क्विंटल कांद्याची आवक झाली. बाजार समितीत कांद्याला कमाल ५ हजार ५०० रुपये, सरासरी ३ हजार रुपये, तर किमान ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक घटली असल्याने कांद्याच्या दर वाढले आहेत. घाऊक बाजारातील दराचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे.

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे. तर दुसरीकडे कांद्याची मागणी बाजारात वाढली आहे. यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. जर आवक आणखी कमी झाली तर दर आणखी वाढतील.
- ज्ञानेश्वर मुसळे (कांदा व्यापारी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news