

सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि. 11) 209 ट्रक काद्यांची आवक झाली आहे. काही क्विंटलला सर्वाधिक दर 3100 तर सरासरी दर 1300 रुपयांचा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याची मागणी वाढल्याने दरात थोडी सुधारणा झाली आहे.
निर्यातबंदी आणि मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने कांद्याचे भाव कोसळले होते. मात्र, बांग्लादेशात कांद्याची टंचाई भासत असल्यामुळे तेथील सरकारने भारतातून कांदा आयात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भारतातील कांदा बांग्लादेशात जात असल्यामुळे कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याला सर्वाधिक दर दोन हजार 500 रुपये तर सरासरी दर एक हजार 100 रुपये मिळत होता. परंतु मागणी वाढल्याने सर्वाधिक दर हा तीन हजार 100 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी दर एक हजार 300 रुपये मिळत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणत आहेत.
दरम्यान, अतिवृष्टी, पुरामुळे यंदाच्यावर्षी कांद्याची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. तसेच कांदा चाळीतील कांदा संपत असल्यामुळे येत्या काळात कांद्याचे भाव आणखी कडाडणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणेल, असा अंदाज कांदा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.