

सोलापूर : सोलापुरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून तीन लाख 44 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे व त्यांचे पथक बार्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यांना माहिती मिळाली की, लातूर येथील सराईत आरोपी अक्षय मारोती शिंदे (वय 25, रा. निलंगा, लातूर) हा बार्शी रेल्वे स्टेशन येथे आहे. त्यानंतर शिंदे यांनी सापळा रचून अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारासह पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 21 ग्रॅम सोन्याचे व 20 ग्रॅम चांदीचे दागिने असे एकूण तीन लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक विजय शिंदे, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान, रवी माने, आश्विनी गोटे, अन्वर सत्तार, विनायक घोरपडे, मनोज राठोड, सूरज रामगुडे, अर्चना मस्के, दीपाली जाधव यांनी पार पाडली.