

सोलापूर : शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर प्रताप नगर तांडा आहे. ही बंजारा समाजाची जिल्ह्यातील मोठी वसाहत आहे. मात्र इतक्या मोठ्या वसाहतीत स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही स्मशानभूमी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमी नसल्याने शेतातच अंत्यसंस्कार करावे लागतात. येथील सामुदायिक स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही सोडवला नाही. यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाकडून प्रयत्नांची गरज आहे.
प्रताप नगर तांड्याची वसाहत सध्या महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. याला साधारणतः वीस वर्षांचा काळ लोटला. सहा हजाराहून अधिक लोकसंख्येचा हा तांडा आहे. महापालिकेत या समाजाचे दोन महापौर व अनेक लोकप्रतिनिधींनी नेतृत्व केले आहे. त्यांच्या कामाच्या ओघात हा प्रश्न तसाच राहिला. त्यांनी हा प्रश्न सभागृहात उचलून धरला असता. स्मशानभूमीचा प्रश्न सहज सुटला असता. एखादा गृहस्थ दगावल्यास त्यांच्या शेतातच त्याच्यावर अंतिमविधी केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही, अशांवर मात्र, त्यांच्या पाहुण्याच्या शेतात किंवा ओढ्याच्या बाजूला अंत्यसंस्कार होतात, मात्र तेेथेही काही वेळा विरोध होतो.
जिल्हा व पालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे. येथील परिसरात शासनाच्या मालकीच्या असलेल्या जागेत स्मशानभूमी करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधीसह उच्च पदस्थ अधिकार्यांकडून प्रयत्नांची गरज आहे.