Solapur News: नवीन एलपीजी गॅस नोंदणी ठप्प

कनेक्शनसाठी इच्छुक नागरिकांचे गॅस एजन्सीकडे हेलपाटे
LPG
LPGPudhari
Published on
Updated on

सोलापूर : शहरात एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्ववत होऊन सिलिंडरचे वितरण नियमितपणे सुरू आहे. असे असताना देखील नवीन घरगुती गॅस कनेक्शनची नोंदणी अद्याप बंदच आहे. एप्रिल महिन्यात तात्पुरती स्थगित करण्यात आलेली ही प्रक्रिया तीन महिने उलटूनही सुरू न झाल्याने नवीन कनेक्शनसाठी इच्छुक नागरिकांना गॅस एजन्सींचे हेलपाटे मारावे लागत आहेत.

पश्चिम आशियात इस्रायल-इराण दरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी कनेक्शन देण्यावर तात्पुरती बंदी घातली होती. उपलब्ध गॅसचा पुरवठा प्रथम विद्यमान ग्राहकांना मिळावा, या केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला होता.

सध्या शहरातील गॅस वितरण व्यवस्था पूर्णपणे सुरळीत आहे. बुकिंगनंतर अवघ्या चार ते पाच दिवसांत ग्राहकांना घरपोच सिलिंडर दिला जात असल्याची माहिती गॅस एजन्सीकडून देण्यात आली. मात्र, सर्व काही पूर्ववत झाले असतानाही नवीन कनेक्शन देण्याबाबत तेल कंपन्यांकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश एजन्सींना का मिळालेले नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या तरी नवीन नोंदणी बंदच आहे

पुरवठा सुरळीत असतानाही नव्या कनेक्शनबाबत निर्णय रखडल्याने प्रथमच गॅस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण आहे. ‘सध्या तरी नवीन नोंदणी बंदच आहे’ असे एजन्सींकडून सांगितले जात असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. आता ही स्थगिती उठवून कंपन्या कधी हिरवा कंदील दाखवणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

शहरात नवीन घरगुती गॅस कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मात्र, नवीन नोंदणी सुरू करण्याबाबत तेल कंपन्या किंवा शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे नवीन कनेक्शन देणे बंद आहे. दुसरीकडे, जुन्या गॅस ग्राहकांना गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत आहे. बुकिंगनंतर कमी कालावधीतच सिलिंडर घरपोच दिला जात आहे. सध्या सोलापूर शहरातील एलपीजी गॅस वितरण व्यवस्था नियमित आणि सुरळीत सुरू आहे.
- सुधीर खरटमल, गॅस एजन्सीधारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news