

सोलापूर : होटगी रोडवरील काँक्रिटीकरणाचे काम थांबविण्याचे महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी तोंडी आदेश दिल्यानंतरही मक्तेदाराकडून काम सुरूच ठेवण्यात आले आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीतही काम तत्काळ थांबवून आवश्यक कामे पूर्ण करण्याचे ठरले होते. पण या आदेशानंतरही मक्तेदाराने आतापर्यंत जवळपास एक किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. शनिवारीही रस्त्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
आसरा चौकासह रस्त्याच्या विविध ठिकाणी बाजूचा भराव भरून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याखाली गेलेले ड्रेनेज चेंबर्स काढण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सर्व आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतरच पुढील काँक्रिटीकरण करावे, अशा स्पष्ट सूचना असतानाही रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुढील भागात ड्रेनेज चेंबर असलेल्या ठिकाणी पोती टाकून तो भाग खुला ठेवत काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे काम थांबविण्याच्या महापालिकेच्या आदेशालाच मक्तेदाराने केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी भूमिगत जलवाहिनी, पाणीपुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेज चेंबर्सची कामे पूर्ण करण्यासंदर्भात महापालिकेने एमएसआयडीसीला तीन पत्रे दिली होती. त्यानंतरही काँक्रिटीकरण करण्यात आले. परिणामी, रस्ता तयार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जलवाहिनी आणि ड्रेनेजच्या कामासाठी नव्या रस्त्यावर पुन्हा खोदाई करण्याची वेळ आली आहे.
जलवाहिनी-ड्रेनेजसाठी ९ कोटींचा आराखडा
जलवाहिनी आणि ड्रेनेजची कामे करण्यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आसरा चौकात १८ व २० इंची जलवाहिनी, गोदुताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी तसेच अन्य जलवाहिनी क्रॉसिंगची कामे करावी लागणार आहेत. रस्त्याखाली गेलेले १८ ड्रेनेज चेंबर्स खुले करणे आणि १२ ठिकाणी नवीन जलवाहिनी क्रॉसिंग करणे अपेक्षित आहे. ही कामे पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता करण्यात आला. यामुळे नव्या काँक्रीट रस्त्याची पुन्हा तोडफोड करावी लागणार आहे.