

सोलापूर : मध्यस्थ असल्याचे भासवून ‘नीट’ परीक्षेच्या उमेदवारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुणांमध्ये फेरफार करू शकतो, असा दावा करून प्रत्येक उमेदवाराकडून 90 लाख रुपयांची घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआईने महाराष्ट्रातील दोन जणांना अटक केली, त्यातील एकजण सोलापूरचा रहिवासी आहे. सीबीआई ने प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली.
संदीप शहा (रा. सोलापूर) आणि सलीम पटेल (रा. नवी मुंबई) हे मुंबईतील परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे पालकांना भेटत असल्याची माहिती सीबीआईला मिळाली. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या काल्पनिक अधिकार्यांशी संबंध असल्याचा खोटा दावा करून नीट 2025 परीक्षेत मिळवणार्या उमेदवारांचे गुण वाढविण्याचे आमिष त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना दाखविले. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून 90 लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती प्रत्येक उमेदवारासाठी 87 लाख 50 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परीक्षा अधिकार्यांवर प्रभाव टाकून नीट व यूजी 2025 च्या गुणांमध्ये फेरफार आपण
करू शकतो. वाढविलेल्या गुणांची माहिती निकाल जाहीर होण्याच्या सहा तास आधी मिळेल असे आश्वासन दिले. तपासानंतर सीबीआईने नऊ जून रोजी दोघांना अटक केली. आरोपी नवी मुंबई व पुुण्यात प्रवेश सल्लागार फर्म चालवणार्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत नीट उमेदवारांची माहिती, रोल नंबर, प्रवेशपत्रे, ओएमआर शीट्स तसेच हवालाव्दारे केलेले आर्थिक व्यवहार सापडले आहेत. या दोघां व्यतिरिक्त सल्लागार फर्म चालविणार्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. संदीप शहा आणि सलीम पटेल यांना मुंबईत तर सह आरोपींना सांगलीतून अटक करण्यात आली. दोघांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 16 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.