

सोलापूर : मराठा समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे विवाह जमवणे क्लिष्ट झाले आहे. समाजात वरांची मोठी संख्या आणि वय पाहता जातीच्या बाहेर संस्कार, आचार, विचार, आर्थिक स्वावलंबन आदी निकषावर योग्य असणार्या आंतरजातीय स्थळांचा सकारात्मक विचार मराठा समाजात रुजणे ही काळाची गरज आहे.
सध्या मराठा समाजात विवाह इच्छुक मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे विवाह इच्छुक असंख्य मुलांचे विवाह खूप वय वाढले तरी जमेनात. त्या तुलनेत मुली कमी तसेच त्या उच्चशिक्षित, कमवत्या झाल्याने त्यांच्यासह त्यांच्या पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा आहेत. यामुळे मराठा समाजात मुलांचे विवाह ही एक भीषण समस्या निर्माण झाली आहे. यावर समाजधुरिणांनी एकत्र येत आंतरजातीय स्थळांसंदर्भात सकारात्मक विचार समाजात रूजवण्याची गरज आहे.
मराठा समाजातील मुलींची संख्या कमी होण्याचे प्रमुुख कारण वीस वर्षांपूर्वी केलेेल्या चुकाचा परिपाक आहे. त्याकाळात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण खूप होत. वंशाला दिवा पाहिजे म्हणून गर्भात मुलींची बेकायदा हत्या करण्यात येत होत्या. परिणामी, त्याकाळात मुलींची संख्या घटली. पर्यायाने मुलांची संख्या वाढली. त्या काळात ज्याकाही थोड्याफार मुली जन्मल्या त्यातील बहुतांश मुली आज उच्च शिक्षित होऊन करिअर ओरिएंटेड झाल्या. त्या तुलनेत मुलांचे शिक्षण खूपच कमी तसेच नोकरीतील त्यांची संख्या अल्पस्वल्पशीच दिसून येत आहे.
समाजातील असंख्य मुली खूप चांगले शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरात आहेत. त्यांना सोलापूर, धाराशिव, लातूरसारख्या तुलनेने मागास, छोट्या शहरातील मुलांची स्थळे पसंत पडत नाहीत. तसेच अशा छोट्या शहरातील मुलांची कमाईही मुलींच्या तुलनेत खूपच कमी आहे. अशातच मुलीच्या पालकांना आपली मुलगी मोठ्या शहरातच नांदायला जावी, असे वाटू लागल्यानेही छोट्या शहरातील विवाहेइच्छुकांचे मुलांचे वांदे होत आहेत.
समाजातील मुलींसह त्यांच्या पालकांचा द़ृष्टिकोन हा आर्थिक सुबत्ता, ऐश्वर्य, भौतिक सुख सुविधा या बाबीकडे जास्त दिसून येत आहे. शेतकरी, छोटे व्यावसायिक, खासगी नोकरदार आदी मुलांच्या स्थळांकडे समाजातील मुलींचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुुळे समाजातील विवाह इच्छुक मुलांचे विवाह ठरणे हा मोठा गहन प्रश्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरजातीय स्थळांचा सकारात्मक विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या प्रथांना मूठमाती द्यावी
पूर्वीसारखे निस्वार्थी, प्रामाणिक मध्यस्थ असत. आता तसे उपलब्ध नाहीत. सध्या लग्न जमवणार्या व्यावसायिक मंडळींचा सुळसुळाट झाला आहे. यासह आणखी काही छोट्या-मोठ्या बाबीमुळे विवाह जमविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यावर समाज प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. जाती समूहामध्ये असणार्या लहान मोठा, गरीब श्रीमंत, घाटा खालचा-वरचा, अक्करमासी, बारमासी या भेदभावाविरुद्ध मराठा समाजाने एकी दाखवत त्यास मूठमाती द्यायला हवी. नवी उमेद, नवा विचार स्वीकारत मराठा समाजाने आंतरजातीय विवाहाचा पर्याय स्वीकारण्याची काळाची गरज आहे.
कालबाह्य रूढींना महत्त्व नको
मराठा समाजातील मुलांची लग्न न जमण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे जन्मपत्रिका पाहून स्थळ नाकारणे, पदर न जुळणे, 96 कुळी, प्रतिष्ठा, आपल्यापेक्षा हलक्या घराण्यातील किंवा बरोबरीतील स्थळ अशा कालबाह्य विचारसरणी तसेच रूढी, परंपरामुळे मराठा समाजातील मुलांचे लग्न जमेनासे झाले आहे.
हे केले पाहिजे
योग्य जोडीदार मिळत नसेल, तर समाजाने आंतरजातीय विवाहाचा पर्याय खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे
सामूहिक विवाह सोहळे, युवक-युवती मेळावे घ्यावे
समाजातील विवाह इच्छुक मुला-मुलींना ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे
शिक्षण, नोकरी, संस्कार यांना प्राधान्य हवेच, त्याबरोबर तडजोडही करावी
मुलींसह तिच्या पालकांनी मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत
आंतरजातीय विवाह जुळण्याविषयी समाजधुरिणींनी पुढाकार घ्यावा
विवाह जुळण्यास येणार्या अडचणी
मुली उच्चशिक्षित, तर मुलांचे शिक्षण कमी
मुलींना स्थिरस्थावर नवरा हवा असतो, परंतु मुलगा मात्र तसा नसतो
शेतकरी मुलांना मुली स्वीकारतच नाहीत
परंपरेनुुसार गोत्र, कुळाच्या मर्यादा पाळल्या जातात
मुलगी व तिच्या पालकांकडून मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा