

सोलापूर : उन्हाळ्यामुळे वातावरण उष्ण बनत आहे. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांना व पक्ष्यांना पाणी मिळत नसल्याने ते मृत्युमुखी पडतात. वन्यजीव जगविण्यासाठी आता जलपात्र ही चळवळ राबविणे गरजेचे असून नागरिकांनी यासाठी आता घरासमोर, परिसरातील झाडांमध्ये जलपात्र अडकवणे गरजेचे झाले आहे.
प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोर अंगणातील झाड असो वा घराच्या भिंतीला जलपात्र अडकवावी व तसेच त्यात नियमितपणे किमान अर्धा लिटर पाणी घातल्यास चिमण्यांसह अन्य पक्ष्यांना सहजासहजी पाणी पिता येणार आहे. शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या शेकडो झाडांना जलपात्र लटकवल्यास पक्षांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी वनविभागाच्या वतीने पुढाकार घेत जनजागृती करावी लागणार आहे. तरच, पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. हर घर जलपात्र व हर झाड जलपात्र ही चळवळ उभारावी लागेल.