Solapur | शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपच्या बैठकीत; सोलापुरात विधान परिषद निवडणुकीस धक्कादायक वळण

Solapur | शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपच्या बैठकीत; सोलापुरात विधान परिषद निवडणुकीस धक्कादायक वळण
Solapur | शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपच्या बैठकीत; सोलापुरात विधान परिषद निवडणुकीस धक्कादायक वळण
Published on
Updated on

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीस आज एक धक्कादायक वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार चक्क भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिले. यामुळे मोहिते-पाटील यांच्या राजकारणाला हा चांगलाच धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आ. उत्तम जानकर आणि माढ्याचे आ. अभिजित पाटील हे बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, याच पक्षाचे करमाळ्याचे आ. नारायण पाटील हे महायुतीच्या उमेदवारीच्या अर्जभरण्याप्रसंगी उपस्थित होते.

यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुरूंग लागला आहे. विधान परिषद निवडणुकीला अद्याप सात दिवस शिल्लक असतानाच सोलापूरमध्ये या मोठ्या राजकीय उलथापालथी पहायला मिळत आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगलाच धक्का बसला.

भाजपा-महायुती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वसंतनाना देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. माळशिरसचे आ. जानकर यांचे चिरंजीव जीवन यांनी उमेदवारी भरली होती. त्यांना माघार घ्यावी लागल्याने नाराज आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह सुरू असलेल्या या बैठकीस खा. ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आ. विजयकुमार देशमुख, माजी आ. दिलीप माने, माजी आ. राजन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आ. धनाजी साठे उपस्थित होते. दरम्यान, महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आ. नारायण पाटील, सांगोल्याचे शेकापचे आ. बाबासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील मतदारांचा महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मोठा विजय खेचण्याची भाजपची रणनीती

सुरुवातीला सोलापूर विधान परिषद निवडणूक बिनविरोधची चर्चा सुरू असतानाच मोहिते-पाटील गटाने आव्हान दिल्याने चांगलीच राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. भाजपने ‘शत प्रतिशत’प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा स्थानिक पाठिंबा मिळवून मोठा विजय खेचण्याची रणनीती आखली आहे. ऐनवेळी दगाफटका नको म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे हे जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही बैठक घेत याविषयी रणनीती आखली आहे. एकूणच यामुळे भाजपाने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news