

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते दशरथ अमोगसिद्ध शेंडगे (वय 40, रा. भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर) यांचा शुक्रवारी (दि. 6) संशयास्पद मृत्यू झाला. शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी चार दिवसांपूर्वी त्यांना मारहाण केली होती. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेंडगे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दशरथ शेंडगे यांना शुक्रवारी सकाळपासून छातीत दुखत होते. श्वास घेण्यास त्रासही होत होता. दुपारी एकच्या सुमारास पत्नी नेहा यांनी दशरथ यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बातमी समजतात त्यांचे नातेवाईक, मित्र आणि पक्षाच्या नेत्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. शेंडगे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. त्यानंतर शेजाऱ्यांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या तीन ते चारजणांनी दशरथ यांना जबर मारहाण केली होती. यामध्ये दशरथ यांच्या छातीला मार लागला होता. तसेच हातावर, पायांवर मारहाणीच्या खुणाही आहेत. तीन दिवस त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना दाद दिली गेली नाही. त्याचबरोबर समोरील लोकांच्या भीतीने ते घरातच बसून राहिले. शेजाऱ्यांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दशरथ यांच्या पत्नी नेहा शेंडगे यांनी केला आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत एमआयडीसी पेलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
शेजाऱ्यांकडून मारहाण
दशरथ शेंडगे आणि त्यांच्या शेजाऱ्यांचा पहिल्यापासून वाद होता. महिनाभरापूर्वी देखील त्यांना मारहाण झाली होती. या वादातून दशरथ याने शेजारच्यांच्या घरासमोर रात्री लिंबू ठेवणे तसेच भंडारा उधळला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी दशरथ याला मारहाण केली. मारहाणी नंतर तू आमच्या घरी चोरी करायला आला होता अशी फिर्याद देवू, तुला इथे राहू देणार नाही अशी धमकी त्यांनी दिली. त्यामुळे घाबरुन दशरथ तीन दिवस घरात बसून होता. शुक्रवारी सकाळी त्रास झाल्यानंतर उपचारपूर्वी त्याचा मृत्यू झाला अशी माहिती कुटुंबियांनी दिली.