

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेची नवरात्रौत्सवातील आठव्या माळेला सोमवारी (दि.29) भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे. देवीने महाराजांना तलवार भेट दिल्याचे मानले जाते. त्याचे प्रतिक म्हणून मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते. ही पूजा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
मंगळवारी दुपारी 1 वाजता मंदिरातील होमकुंडावर दुर्गाष्टमीनिमित्त शतचंडी वैदिक होमास प्रारंभ होणार आहे. या होमाचे यजमान जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पूजार सपत्नीक राहणार असून होमाचे पौरोहित्य स्थानिक ब्रम्हवृंद करणार आहेत. दुपारी 1 वाजता सुरू होणार्या वैदिक होमास सायंकाळी 6.10 मिनिटांनी पूर्णाहूती देण्यात येणार आहे. बुधवारी खंडेनवमी साजरी होत असून त्यादिवशी दुपारी 12 वाजता या होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी पार पडणार आहे. त्यानंतर घटोत्थापन होणार आहे.
सायंकाळीं सार्वत्रिक शस्त्रपूजन, शमीपूजन, सीमोल्लंघन पार पडणार आहे. देवीचे सीमोल्लंघन व शिबिकारोहण सोहळा गुरुवारी पहाटे पार पडणार आहे. दहा माळा आणि अकरावे सीमोल्लंघन यंदा अनेक वर्षानंतर यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवात तिथी क्षयामुळे दहा माळा आल्या असून अकराव्या दिवशी दसरा (विजयादशमी) आला आहे.
कुमारिका पूजन
सध्या सुरू असलेल्या देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात कुमारिका पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून दुर्गाष्टमीनिमित्त मंगळवारी घरोघरी कुमारिका पूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.