

कासेगाव : कासेगाव (ता. पंढरपूर) येथे महामाया देवीची ‘रजा’ मोठ्या भक्तिमय वातावरणात बुधवारी झाली. शारदेय नवरात्र उत्सवात कासेगावमध्ये अनेक भक्तमंडळी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसाच्या मध्यरात्रीपासून ते तिसर्या माळेपर्यंत अनेक भक्तगण देवीचा निरंकार उपवास करतात.
निरंकार उपवास म्हणजे दीड दिवस अन्न पाण्याशिवाय थुंकीसुद्धा न गिळता उपवास करणे म्हणजे निरंकार उपवास. निरंकार उपवासाची सांगता महामाया देवीची रजा झाल्यानंतर लिंबू साखरेचे सेवन करून पाणी पितात व रजा संपन्न झाली, असे मानतात.
तसेच 11.30 वाजल्यापासून महामाया देवीची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघते. पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर भाकणूक संपन्न होते. भाकणुकीचा मान माणिक गंगथडे कुटुंबीयांना आहे. महामाया देवीची पूजा करण्याचा मान गुरव कुटुंबियांना आहे. रजा यशस्वी संपन्न होण्यासाठी कासेगाव ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले होते.
त्याचबरोबर पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी रजा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली. त्याचबरोबर वाहतुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, म्हणून वाहतुकीचे योग्य नियोजन केले. रजेमध्ये सर्व मानकरी उपस्थित होते.
कासेगावमध्ये रजेसाठी सुमारे 2 लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. यामध्ये महिला भाविकांची संख्या उल्लेखनीय होती. कासेगावमधील वेगवेगळ्या सेवाभावी संस्थेने येणार्या भाविकांना केळी, सरबत, लिंबू साखरेचे व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. राज्य परिवहन महामंडळाकडून कासेगावला येणार्या भाविकांसाठी एसटी बसेसची सोय केली होती.