

मंगळवेढा : केमिस्ट संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादिवशी तालुक्यातील सर्व औषध दुकाने कडकडीत बंद राहणार आहेत. या संदर्भात मंगळवेढा केमिस्ट संघटनेच्या वतीने मंगळवारी प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार मदन जाधव आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांची भेट घेऊन बंदबाबत सविस्तर माहिती दिली. संपाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि प्रशासनाचे सहकार्य लाभावे, या हेतूने हे निवेदन देण्यात आले. यावेळी केमिस्ट बांधवांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली आणि हा बंद शांततामय मार्गाने पार पाडला जाईल, असे आश्वासन प्रशासनाला देण्यात आले.
केमिस्ट बांधवांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यामध्ये औषध व्यवसायातील जाचक अटी, ऑनलाईन औषध विक्रीला असलेला विरोध आणि व्यावसायिकांच्या हिताचे विविध प्रश्न यांचा समावेश आहे. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नाही. यामुळे आता देशपातळीवर एकजूट दाखवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. केमिस्ट बांधवांच्या रास्त मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद अत्यंत महत्त्वाचा आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
प्रशासनाला निवेदन देताना मंगळवेढा केमिस्ट संघटनेचे सचिव विजय क्षीरसागर, दयानंद पाटील, दीपक घुले, सचिन फडतरे, स्वप्नील फुगारे, छत्रपती वाकडे, अमोल जाधव यांच्यासह संघटनेचे अन्य प्रमुख पदाधिकारी आणि केमिस्ट सभासद उपस्थित होते. 20 मे रोजी होणाऱ्या या बंदमुळे औषध विक्री सेवा बंद राहणार असल्याने, नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि अत्यावश्यक गरजांचे नियोजन करावे, अशीही चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू आहे.