

सोलापूर : चहा आणि सोलापूरकरांचे एक अतूट नाते आहे. चहा शिवाय कोणाचा दिवस सुरू होत नाही. सोलापुरात चहाच्या दुकानांचे अनेक ब्रँडस् असून लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे. सकाळचा चहा म्हणजे प्रत्येक दिवसाची आनंदी सुरुवात. आणि केव्हाही चहा म्हणजे सर्व प्रकारचे भेद पुसून माणसांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा. चहाची गोष्ट कधीच न संपणारी आहे.
शहरातील बस स्थानक, सात रस्ता, आसरा, सैफुल, जुळे सोलापूर, बाळीवेस, अशोक चौक, गुरुनानक चौक, शांती चौक, जोडबसवण्णा चौक, नवी पेठ यासह अन्य भागातील चहाच्या दुकानांमध्ये चहा शौकिनांची नेहमीच गर्दी दिसून येते. चहाचा उगम चीनमध्ये झाला असे मानले जाते, मात्र भारतातील चहाचा प्रवास ब्रिटिश राजवटीत सुरू झाला. 19व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात चहाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले आणि भारताच्या विविध भागांमध्ये चहाचे मळे तयार झाले. आसाम, दार्जिलिंग आणि नीलगिरीच्या प्रदेशांमध्ये चहा उत्पादन हा प्रमुख व्यवसाय बनला आणि भारत चहा उत्पादनात आघाडीवर येऊ लागला.
चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाईट टी, हर्बल टी आणि इतर. प्रत्येक प्रकारचे चहा त्याच्या चव, सुगंध आणि गुणधर्मांमुळे वेगळा अनुभव देतात. चहा बनवताना विविध मसाल्यांचा वापर करून त्यात विशेष स्वाद आणला जातो, जसे की आल्याचा मसाला चहा, इलायची चहा, पुदिना चहा इत्यादी. जगात चहाप्रेमींची कमी नाही. मग तो चहा दुधाचा असो वा बिना दुधाचा.. साखरेचा असो वा बिना साखरेचा किंवा तो गुळाचाही. चहा तो शेवटी चहाच असतो. कामादरम्यान आलेला थकवा घालवणारा चहाच असतो. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाना करणारा चहाच असतो.
आवडत्या पेयाचा आनंद
राष्ट्रीय चहा दिवस हा चहाप्रेमींना त्यांच्या आवडत्या पेयाचा आनंद लुटण्याचा आणि चहाशी संबंधित विविध गोष्टी समजून घेण्याचा दिवस आहे. हा दिवस आपल्या जीवनातील चहाचे स्थान अधोरेखित करतो. चहा हा फक्त एक पेय न राहता भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे, 15 डिसेंबर रोजी आपल्या आवडत्या चहाचा आस्वाद घ्या आणि चहाच्या या सफरीत रमून जा.