सोलापूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या अमानवीय घटनेचे पडसाद सोलापूर शहरात उमटले. पीडित कुटुंब सोलापूरचे रहिवासी असल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेच्या निषेधार्थ रविवारी ( दि. 3 ) सायंकाळी जोशी गल्ली येथील जुने विठ्ठल मंदिर येथे सकल हिंदू संघटनेतर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी उपस्थित राहून पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. उपस्थित महिलांनी ‘नराधम आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी आक्रमक मागणी केली.
घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी (दि. 5) सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट समोर भव्य आंदोलन व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या नियोजन सभेत सुधीर बहिरवाडे, अंबादास गोरंटला, रवी गोणे, पंकज कुलकर्णी यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात या घटनेमुळे अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे.