सोलापूर : शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीच्या प्रलंबित हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य शासनाने 1642.18 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यापासून ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित केली. त्यास अनुसरुन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणार्या प्रति वर्ष, प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरु केली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत पाच हप्ताची दहा हजार रुपये वितरित केली आहे. डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या महिन्यातील सहाव्या हप्त्यासाठी शेतकरी प्रतिक्षेत होते. तसेच यापूर्वीच्या हप्त्यांमधील काही त्रुटीमुळे काही शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. त्यासाठीही मंजूरी दिली आहे.
पाच लाख 40 हजार शेतकर्यांना लाभ
जिल्ह्यात पाच लाख 40 हजार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत. तेवढेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आहेत. या योजनेत सुरुवातीला सहा लाख 90 हजार शेतकर्यांनी नोंदणी केली होती. त्यात छाननी झाल्यानंतर आता पाच लाख 40 हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत. लवकरच ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

