

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी चार नगरपलिका जिंकून भाजप नंबर वन पक्ष बनला आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने विजयाची बाजी मारली असून, भाजपने चार तर शिवसेना शिंदे गटाने तीन नगरपालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. स्थानिक आघाड्यांनी तीन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शिवसेना उबाठा गटाने प्रत्येकी एका जागेवर यश प्राप्त केले.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे. माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेचे दुधनी येथे नगराध्यक्षांसह 22 उमेदवार विजयी झाले. प्रथमेश म्हेत्रे यांनी दुधनी नगरपालिका खेचून आणली. दुधनीतील 20 नगरसेवकांच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
भाजप - शेकापच्या युतीला सांगोल्यातील मतदारांनी नाकारले असून, माजी आ. शहाजीबापू पाटील हे शिंदे शिंदे सेनेचा झेंडा नगरपरिषदेवर फडकविण्यात यशस्वी झाले. तेथे आंनदा माने हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. यात 23 पैकी 15 जागांवर शिंदे शिवसेना विजयी झाली. भाजप आघाडीला फक्त आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मोहोळमध्ये प्रथमच शिंदे सेनेच्या 22 वर्षीय सर्वात तरुण सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. याठिकाणी भाजपाला अकरा जागी यश मिळाले. शिंदे शिवसेनेला आठ तर ठाकरे शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली.
कुर्डुवाडी नगरपरिषदेत शिवसेना उबाठा गटाने नगराध्यक्षपदावर यश मिळवले. याठिकाणी जयश्री भिसे यांनी यश संपादन केले. मात्र, या ठिकाणी नगरसेवकपदाच्या बहुतांश ठिकाणी माजी आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवले.
आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अकलकोट आणि मैंदर्गी नगरपरिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले. अक्कलकोटमध्ये भाजपचे मिलन कल्याणशेट्टी हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. एकूण 25 जागेपैकी 22 जागेवर भाजपाने घवघवीत यश संपादन केले. काँग्रेसला फक्त दोन जागांवर आणि शिंदे शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. मैंदर्गीत नगराध्यक्षपदासह 20 पैकी 18 जागेवर विजयी होत प्रथमच भाजपाने याठिकाणी कमळ फुलविले. अंजली बाजारमठ या नगराध्यक्षा झाल्या. स्थानिक आघाडीला फक्त दोन जागा मिळाल्या असून आघाडीचा याठिकाणी दणदणीत पराभव झाला.
भाजपाने बार्शी नगरपरिषदेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला. 42 पैकी 17 जागांवर भाजपा यश संपादन केले. शिवसेना शिंदे गटाने सहा तर उबाठा गटाला 19 जागांवर विजयी मिळाला. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 17 जागेवर माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे. अनगर नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील या बिनविरोध झाल्या आहेत.
अकलूज नगरपालिका निवडणूक ही लक्षवेधी ठरली. माजी भाजपाचे आ. राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली होती. खा. धैर्यशील मोहीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. एकूण 26 पैकी 22 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने यश मिळवले. भाजपाला अकलूजमध्ये फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले.
करमाळा नगरपरिषदेवर स्थानिक आघाडीच्या मोहिनी सावंत या नगराध्यक्ष बनल्या आहेत. 20 पैकी आठ जागांवर स्थानिक विकास आघाडीने बाजी मारली. यात भाजपाचे सात तर शिवसेना शिंदे गटाचे पाच नगरसेवक निवडून आले. मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आ. समाधान आवताडे यांच्या हातातून मंगळवेढा नगरपरिषद निसटली. याठिकाणी आवताडे यांच्या काकू सुनंदा आवताडे मंगळवेढा नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या. याठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नऊ जागांवर विजय मिळवला. भाजप महायुतीने याठिकाणी अकरा जागी यश मिळवले.
पंढरपूरचे स्व. आमदार भारत भालके यांच्या सून डॉ. प्रणिता भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. त्यांच्या आघाडीला नगरसेवकपदाच्या अकरा जागा मिळाल्या आहेत. भाजपला याठिकाणी वीस जागी यश मिळाल्या. तसेच भाजप पुरस्कृत चार नगरसेवक याठिकाणी विजयी झाले आहेत. याठिकाणी अपक्ष एक उमेदवार जिंकला आहे.
मैंदर्गीत प्रथमच फुलले कमळ
मैंदर्गी येथील स्थानिक गटातटाच्या राजकारणाला यंदा मतदारांनी नाकारले. याठिकाणी प्रथमच कमळ फुलले. भाजपाच्या अंजली बाजारमठ यांनी स्थानिक गटाचे उमेदवार शिवम पोतेनवरू यांचा दोन हजार 477 मतांनी पराभव करत विजय मिळवला. भाजपाने 20 पैकी 18 जागांवर विजय मिळवत स्थानिक गटांचे वर्चस्व मोडीत काढले.
शत प्रतिशतचा प्रयत्न निष्फळ
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका निवडणुकीत सूत्रे हाती घेऊन शत प्रतिशतचा नारा देत जिल्ह्यातील सर्व बाराही ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्षपदासठी उमेदवार उभे केले. अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी या नगरपलिका तर अनगर नगरपंचायत या चार ठिकाणीच भाजपला यश मिळाले. सन 2017 मध्ये अक्कलकोट आणि दुधनी येथे भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले होते. यंदा यातील दुधनी भाजपाच्या हातातून निसटले असून, मैंदर्गी आणि बार्शीवर सत्ता आली आहे. सन 2017 च्या तुलनेत यंदा भाजपचे दोन नगराध्यक्ष अधिक निवडून आले आहेत.
पक्षनिहाय निवडून आलेले नगराध्यक्ष
अक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी (भाजप)
मैंदर्गी - अंजली बाजारमठ (भाजप)
बार्शी - तेजस्विनी कथले (भाजप)
अनगर - प्राजक्ता पाटील (भाजप)
दुधनी - प्रथमेश म्हेत्रे (शिवसेना शिंदे गट)
सांगोला - आनंदा माने (शिवसेना शिंदे गट)
मोहोळ - सिद्धी वस्त्रे (शिवसेना शिंदे गट)
कुर्डूवाडी - जयश्री भिसे (शिवसेना ठाकरे गट)
मंगळवेढा - सुनंदा अवताडे (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)
पंढरपूर - डॉ. प्रणिता भालके (तीर्थक्षेत्र विकास आघाडी)
अकलूज - रेश्मा अडगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
करमाळा - मोहिनी सावंत (स्थानिक विकास आघाडी)