

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी गुरुवारी (दि.15) सरासरी 55 टक्के मतदान झाले आहे. आज शुक्रवार दि. 16 रोजी निकाल असून शहराचे भावी कारभारी कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सकाळ दहापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 15 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दर एक तासाला प्रभागनिहाय निकाल जाहीर केले जाणार आहेत. एका प्रभागाच्या 14 फेऱ्या होणार आहेत. दुपार दोन ते अडीच वाजेपर्यंत महापालिकेचा निकाल जाहीर होणार आहेत.
गुरूवार महापालिकेच्या 102 जागांवरील 564 उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शुक्रवार दि. 16 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. प्रथमच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ही मतमोजणी होत आहे. मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पुर्ण झाली आहे. चार सदस्यसंख्या असलेल्या प्रभागांसाठी 14 फेऱ्यांमध्ये तर तीन सदस्यसंख्या असलेल्या प्रभागांसाठी नऊ ते दहा फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. आहेत. एकूण 15 टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी किमान पाऊण तासांचा कालावधी लागणार आहे. या गतीने सर्व प्रभागांची मतमोजणी पूर्ण होऊन दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत महापालिकेचा एकूण निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असून सोलापूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल असणार आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 40 टक्के मतदान
मतदानासाठी नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 40.39 टक्के मतदान झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. दरम्यान, दुपारनंतर शहरातील काही मतदान केंद्रावर रांगा लागल्याने 53 टक्केपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. काही ठिकाणी उशिरा रांग लागल्याने अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो.