

सोलापूर : गेल्या काही वर्षांपासून सोलापूर - मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, 10 सप्टेंबरपर्यंत तिकीट बुकिंग सुरू होऊन सप्टेंबरअखेर प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होर्ईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्तीसाठी कंपनीने अर्ज मागविले असून, येत्या 4 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर विमान टेकऑफ होणार आहे. संजय घोडावत यांच्या स्टार एअरलाईन कंपनी विमान सेवा सुरू करण्यासाठी तयारी दर्शविली असून, डिजीसीआयशी करारही पूर्ण झाला आहे. विमानसेवा तिकीटसाठी स्टार एअर कंपनीच्या अधिकार्यांनी सोलापुरात येऊन तिकीट विक्री एजंटांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेसाठी उडान योजनेच्या धर्तीवर एका वर्षासाठी व्हायॅबिलिटी गॅप फंडिंग योजना राबवण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा शासकीय आदेशही निघाला आहे. या शासन निर्णयानुसार स्टार एअर कंपनीला प्रती आसनामागे 3,240 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. उडान योजनेत समावेश झाल्यानंतर राज्य शासनाची योजना बंद केले जाणार आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान 5 मिनिटांची स्लॉट मिळण्याची शक्यता आहे. विमानसेवेसाठी सोलापूरकरांची सकाळची वेळ मिळावी अशी मागणी आहे. परंतु, मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने तेथील विमान टेकऑफ लँडिंग व्यस्त शेड्युलमधून सोलापूरकरांसाठी अपेक्षित वेळ मिळण्याची पहिल्या टप्प्यात शक्यता कमी आहे.