

सोलापूर : परिवहन महामंडळाच्या आवडेल तेथे पर्यटनाचा प्रवास योजनेचा पास आता प्रवाशांना ऑनलाइन काढता येणार आहे. त्यामुळे पास मिळवण्यासाठी महामंडळाच्या बसस्थानकात जाण्याची व आरक्षणाच्या खिडकीसमोर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवाशांचा वेळ व श्रम यामुळे वाचणार आहेत. पर्यटकांना पर्यटनाचे नियोजन करणे सोपे होईल.
महामंडळाने या योजनेतील चार व सात दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळावरून आवश्यक माहिती भरूनही पास काढता येणार आहे. हा पास पीडीएफ स्वरूपात मोबाइलमध्ये जतन करता येणार आहे व आवश्यकतेनुसार त्याची प्रिंटही काढता येईल. पासवरील क्यूआर कोड स्कॅन करून त्याची वैधता तपासण्याची सुविधा यात उपलब्ध आहे.
पर्यटन, धार्मिक यात्रा तसेच सलग अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल. ऑनलाइन पासमुळे कागदी पास हरविण्याची किवा ती खराब होण्याची भिती नाही. चार आणि सात दिवसांच्या पासमुळे पर्यटन व धार्मिक यात्रेसाठी एसटीने प्रवास करणे सोयीचे होणार आहे. ऑनलाइन सुविधेमुळे पास काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल.
येथे काढा ऑनलाईन पास
एसटीच्या या संकेतस्थळावरून पाससाठी अर्ज करता येईल. अडचण आल्यास १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.