MSRDC office: जिल्ह्यातील एमएसआरडीसीचे कार्यालय पुण्याने पळवले

सोलापूरकरांना कळलेच नाही; पुण्यातील कार्यालयात केले विलीन
MSRDC office |
MSRDC office: जिल्ह्यातील एमएसआरडीसीचे कार्यालय पुण्याने पळवलेPudhari Photo
Published on
Updated on
सुमीत वाघमोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सोलापुरातील कार्यालय बंद करून ते पुणे कार्यालयात विलीन करण्यात आले. याची खबर ना सोलापुरातील लोकप्रतिनिधींना, ना नागरिकांना. एवढे मोठे कार्यालय हलवले, तरी याचे सोयरसूतक कुणालाच नसल्याचे दिसून आले.

या खात्याचा सोलापुरात अजिबातच ठावाठिकाणा नसल्याने याविषयी संबंधित खात्याच्या पुणे विभागीय कार्यालयात सर्व लँडलाईनवर फोन केला असता ते बंद आहेत. संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा मोबाईलवरही संपर्क होऊ शकला नाही.

एमएसआरडीसीचे सोलापुरातील कार्यालय हुतात्मा शॉपिंग सेंटरमध्ये होते. 2002 मध्ये सोलापुरातील प्रमुख रस्ते, भुयारी रेल्वे मार्ग, रेल्वे उड्डाणपूल आदींसह विविध कामे एमएसआरडीसी मार्फत झाली. यातील काही कामे बीओटी तत्त्वावर करण्यात आली. त्याच्या वसुलीसाठी होटगी रोड, मंगळवेढा रोड, अक्कलकोट रोड आणि बार्शी रोडवर टोल नाके बसविण्यात आले.

सोलापूरचा विकास कसा होणार?

एमएसआरडीसीचे कार्यालय आता पुण्याला स्थलांतरित झाल्याने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राज्य शासनाच्या अख्यारीतील रस्त्यांचे नूतनीकरण, नव्याने रस्ते करणे, त्याची डागडुजी, उड्डाणपुले ही कामे करण्यासाठी आता पुण्याला चकरा माराव्या लागणार आहेत. महत्त्वाची कार्यालये स्थलांतरित केली जात असतील, तर सोलापूरचा विकास होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजब खुलासा...

दरम्यान, सोलापूरचे कार्यालय तात्पुरते होते. कामे पूर्ण झाल्यानंतर ते पुण्याच्या कार्यालयात विलीन होणार होते. त्यानुसार ते झाले, असा अजब खुलासा संबंधित खात्याच्या कनिष्ठ कर्मचार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केला.

सोलापूरकरांच्या उठावाची गरज

सोलापुरातील लोकप्रतिनिधींना एमएसआरडीचे कार्यालय पुण्याला गेल्याचे माहीतही नसेल. काहींना याची कल्पना असली, तर ते अद्याप गप्प का, असा प्रश्न आहे. ‘आपल्याला काय करायचे’ या मानसिकतेमुळे शहर-जिल्ह्याचे मोठे नुकसान होत आहे. एमएसआरडीसीनंतर पुढील काळात आणखी कोणती कार्यालये बंद होतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे सोलापूरकरांनीच याविषयी उठाव करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news