

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 27 ते 29 मे मध्ये (एमपीएससी) झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये एक हजार 516 उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात झाली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 27 जणांचा समावेश आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय मंडळामार्फत करण्यात येणार आहे. मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांस वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केले जाणार आहे. निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्जात दिलेली माहिती खोटी, चुकीची आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्यात येणार आहे.
पुण्यातील सर्वाधिक उमेदवार
राज्यातील 1 हजार 516 विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले आहेत. त्यातील सर्वाधिक 1004 विद्यार्थी पुणे केंद्रातील आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर येथील 143, नाशिक येथील 111, नवी मुंबई 108, नागपूर 104 आणि सर्वात कमी 46 विद्यार्थी अमरावती येथील आहेत.
एमपीएससीचा कट ऑफ वाढला
खुल्या गटाचा कट ऑफ 507, एसईबीसी 490, ओबीसी 485, एनटी 463, ईडब्ल्यूएस आणि एससी 445, तर एसटीचा कट ऑफ 415 आहे. मागील काही वर्षाचा कट ऑफ पाहता 490 पर्यंत होता. यंदा मात्र हा कट ऑफ 500 च्या पुढे गेला आहे. यावरून स्पर्धा परीक्षादेखील दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत असल्याचे चित्र दिसत आहे.