

सोलापूर : जिल्ह्यात वाळू तस्करी चालणार नाही. वाळू चोरणार्या पाच जणांविरोधात एमपीडीएची कारवाई केल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी (दि. 3) दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येेथे अधिकार्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार समाधान आवताडे, आ. देवेंद्र कोठे उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील वाळू चोरी बंद व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर वाळू चोरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाच लोकांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. यापुढे जिल्ह्यात कोणीही वाळूची तस्करी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही वाळू उपसा करू नये.
सरकारकडून वाळू धोरण क्लिअर आहे. त्यामुळे कोणीही वाळू उपसा करू नये. अन्यथा कुणालाही सोडणार नाही. वाळू उपसा केलेल्या लोकांवर कारवाई करताना कोणत्याही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्यास त्यांचे काहीही ऐकून घेतले जाणार नाही. यापुढे वाळू उपसा केल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.