

पंढरपूर : लोकशाहीत आपल्या मताचे मूल्य सर्वाधिक आहे. या देशातील गरिबातील गरीब आणि सर्वाधिक धनाढ्य नागरिकाला मताचा एकच अधिकारी आहे. तोच अधिकारी हे हुकूमशाही प्रवृत्तीचे सरकार चोरत आहे. हा या भारत मातेवर, लोकशाहीवर केला जाणारा अत्याचार आहे. त्यामुळे आपल्या अधिकारासाठी, मत स्वातंत्र्यासाठी, लोकशाही धोक्यात आहे, यासाठी दुसरी लढाई लढावी लागणार आहे. महिला, भगिनींनी या लढाई साठी तयार व्हावे, असे आवाहन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
वाखरी ( ता. पंढरपूर ), येथील स्व. गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित महिला मेळावा, आणि महिलांच्या सन्मान सोहळ्यात खा. शिंदे बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रणिता भालके, साधना भोसले, संगीता काळे, निकिता देशमुख, वर्षा शिंदे, वाखरीच्या सरपंच धनश्री साळुंखे उपस्थित होत्या.
तत्पूर्वी व्याख्याते नंदकुमार दुपडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना उद्योग आणि व्यवसाय विषयक मार्गदर्शन केले. महिलांना गृहउद्योग, शेती पूरक उद्योग याची माहिती देतानाच विविध शासकीय योजनांचीही उपयुक्त माहिती सांगितली. खा. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. हळदी-कुंकू समारंभ संपन्न आला. यावेळी प्रणिती भालके, वर्षा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष संग्राम गायकवाड, उपसरपंच उमादेवी जगताप यांच्यासह ग्रा.पं. सदस्य आणि ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुनीता गायकवाड यांनी केल. विक्रम बिस्किटे यांनी सूत्रसंचलन केले. आभार माजी सरपंच कविता पोरे यांनी मानले.