

वेळापूर : शक्तीपीठ महामार्गामुळे माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांशी माढा लोकसभेचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या महामार्गा संदर्भात वेळापूर गावची बैठक श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर परिसरात बाधित शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून प्रकल्पग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना आणि मते जाणून घेतली.
यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी सामूहिकपणे हात वर करून शक्तीपीठ महामार्गाला आपला तीव्र विरोध दर्शवला. हा महामार्ग आमच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करणारा आहे, त्यामुळे आम्हाला हा प्रकल्प नकोच, अशा भावना शेतकऱ्यांनी आक्रमकपणे मांडल्या.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना खा. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातील व सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन मी स्वतः शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. त्यांच्या भावना समजून घेतल्या जातील. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे हित हेच पहिले प्राधान्य असेल. यासंदर्भात माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व आ. उत्तमराव जानकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून, शेतकऱ्यांच्या हिताचाच योग्य तो निर्णय घेतला जाईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइं तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी केले. यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, पंचायत समिती सभापती दत्ता मगर, हनुमंत साळुंखे, कमलाकर माने-देशमुख, रिपाइं तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे, चेअरमन उत्तम काशिद, धनंजय माने-देशमुख, सुनील मुंगूसकर, नामदेव देवकते, मोहन भाकरे, अमृत माने-देशमुख, राजू देवकते, अमोल व्होरा, तुकाराम राऊत, विजय देशमुख, विजय टिके, भैय्या कोडग, विजय पवार यांसह प्रमुख पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांचा हा वाढता आणि आक्रमक विरोध पाहता, आता या शक्तीपीठ महामार्गाचे भवितव्य काय असणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.