

दुधनी / मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (ज) येथील बोरी नदीच्या पुलावरील पाण्यातून दुचाकीवरून जाणार्या तरुणाचा तोल गेल्याने दुचाकीसह तो वाहून गेला. रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार (वय 27, रा. बबलाद) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवार (दि.10) रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली.
मागील तीन दिवसांपासून कुरनूर धरणातून पाणी सोडल्यामुळे बोरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी आंदेवाडी येथील पुलावरून वाहत आहे. पुलाचे गार्डस्टोनही बुडाल्याने तेही पाण्याखाली गेले आहेत.
रविवारी सकाळी बबलाद येथून रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार व त्याचा चुलत भाऊ परमेश्वर बिराजदार हे दोघे कामानिमित्त दुधनीकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. पण वाटेत असणार्या आंदेवाडी (ज) येथील बोरीनदी पुलावर पाणी आले होते. पुलावरील गार्डस्टोनहीअन् रस्ताही दिसत नव्हते. तरिही यावेळी मागे बसलेला परमेश्वर बिराजदार दुचाकीवरून उतरला व पाण्यातून चालत निघाला. तर रेवणसिद्ध बिराजदार दुचाकीवरून वाहत्या पाण्यातून वाट काढत पुढे निघाला. पाण्याच्या प्रवाह वेगात होता. वाहत्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने रेवणसिद्ध याचा तोल सुटल्याने दुचाकी प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली. रेवणसिद्धही त्या प्रवाहासोबत वाहून गेला. युवक पुलावरून वाहून गेल्याने समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बोरीनदीमध्ये काट्याची झाडे जास्त असल्याने रेवणसिद्धचा शोध घेताना अडथळा येत होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दलाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरवसे, पोलीस हवालदार पाटील, शिंदे, महसूल विभागाचे नायबतहसीलदार भंडारे, सर्कल प्रदीप जाधव, तलाठी थोरात आदी टीमसह दाखल झाले. परिसरातील गावकरी व या टीमने सर्व ठिकाणी पाहणी केली, पण काहीही हाती लागले नाही. उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती, ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.