

सोलापूर : ज्यांना ज्यांच्या कामासाठी, योगदानासाठी कायम दुर्लक्ष केले जाते, अशा मातांचा सन्मान आणि गौरव करणारा दिवस म्हणजे ‘मदर्स डे’. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिवस साजरा केला जातो.
मदर्स डे असला की, तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या निःस्वार्थी योगदानाचा हा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस. यादिवशी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचाही दिवस. मराठीत फ. मु. शिंदे नावाच्या कवीने आपल्या आई कवितेत आईचे ममत्व सांगताना, म्हटले आहे आई एक नाव असते, घरातल्या घरात गजबजलेले गाव असते. या दोनच ओळीतून त्यांनी आईचे ममत्व आणि महत्त्व सांगितले आहे. आई म्हणजे जगातील एक सर्वश्रेष्ठ असे नाते आहे, ज्या नात्याची तुलना कशाबरोबरही केली जाऊ शकत नाही.
आईची माया, प्रेम तिच्या मुलांच्यावरील मायेची तुलना जगातील कुठल्याच, कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. आईच्या पोटी एकदा मुलं जन्माला आले की, मग तिचे सगळं आयुष्य मुलासाठीच देऊन टाकते, तेही कोणताही स्वार्थ न ठेवता. या अशा निस्सीम प्रेमाच्या, मायेच्या आईसाठीच, तिचा गौरव करण्यासाठीच जगभरात साजरा केला जातो तो म्हणजे मदर्स डे.
आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मातृदिन अख्ख्या जगात साजरा केला जातो. आताची सगळीच मुले या दिवशी आपल्या आईचा गौरव आणि सन्मान तर याच दिवशी करतात. इतर दिवशी त्यांच्या कामाकडे, त्यांच्या कष्टाकडे, त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जात असले तरी आजच्या दिवशी मात्र आईसाठी त्यांची मुले आनंदाचा महोत्सवच साजरा करतात. भारतीय संस्कृतीत मातांना नेहमीच अनन्यसाधारण असे स्थान मिळाले आहे.