

सोलापूर : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागलेल्या मान्सूनचे अखेर गुरुवारी (दि. २५) सायंकाळी सोलापुरात आगमन झाले. आर्द्रा नक्षत्रातील हा पहिला पाऊस पडला. तोही अवघा ४. १ मिमी पाऊस होता. अगदी काही मिनिटे म्हणजे रिमझिम स्वरूपात पाऊस आला असला तरी हेही नसे थोडे अशी अवस्था सोलापूरकरांची झाली आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोलापुरात अक्षरशः चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहिली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असला तरी सोलापूरवर तो रुसलेलाच होता.
मात्र, गुरुवारी सायंकाळी शहराच्या काही भागात झालेल्या पावसाच्या सरींमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. आता मोठ्या, दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जून २०२५ मध्ये जिल्ह्यात २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर जून २०२६ मध्ये आतापर्यंत केवळ २२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.