

सोलापूर : सध्या, ऑनलाईनचा जमाना आहे. या युगात एकमेकांना पैसे पाठवण्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. या जमान्यातही लोकांचा विश्वास हा पोस्ट खात्याच्या मनिऑर्डरवरच असल्याचे सिद्ध होत आहे. मागील आर्थिक वर्षात एकट्या सोलापूर विभागातील पाच तालुक्यातून पंधरा हजार 980 जणांनी धनप्रेष (मनिऑर्डर) द्वारे पैसे पाठवलेले आहेत.
मनिऑर्डर (धनप्रेष) ही एकमेकांना पैसे पाठवण्याची प्रणाली इंग्रजकालिन आहे. याचा प्रारंभ हा भारतात एक जानेवारी 1880 रोजी पोस्ट कार्यालयातून करण्यात आले. यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन फॉर्म भरून पैसे पाठवावे लागते. सध्याच्या पिढीला पोस्ट कार्यालयात जाणे, धनप्रेषचे (मनिऑर्डर) फॉर्म घेणे व ते भरणे शक्य होत नाही. यामुळे वेळ व पैसेही अधिक मोजावे लागतात. म्हणून, लाखो तरुण हे सध्या आपल्याकडील भ्रमणध्वनीतील सुविधांचा उपयोग करत धनप्रेषची नवी पद्धत अवलंबत आहेत. शिवाय, ही गतिमान प्रणाली आहे. तरीही पोस्टाने आपली विश्वासार्हता टिकून ठेवली आहे. म्हणूनच एका वर्षात सोलापूर विभागातून पंधरा हजार 980 जणांनी मनिऑर्डर केली. या विभागात शहरासह दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्कलकोट व अन्य तालुक्यांचा समावेश आहे. रोज किमान 44 जण मनिऑर्डरने अन्य व्यक्तीला अन्यत्र पैसे पाठवलेले आहेत. एआय सारख्या प्रणालीच्या आगमनाच्या काळातही पोस्ट विभागाने समाजातील आपली ओळख व विश्वासही टिकवून ठेवला आहे.
ऑनलाईनच्या जमान्यातही प्राधान्य
फोन पे, गुगल पे, पेटीएम, आरटीजीएस, नेफ्ट असे प्रकार सध्या भ्रमणध्वनीच्या स्क्रीनवर उपलब्ध असतानाही पोस्ट विभागाच्या मनिऑर्डरला प्राधान्य देणार्यांची संख्याही मोठी आहे.