Mohol News: मुख्य बाजारपेठ रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

मोहोळमध्ये वाहतुकीला अडथळा; रुग्णवाहिकाही खोळंबल्या
Mohol News: मुख्य बाजारपेठ रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचा ठिय्या
Published on
Updated on

मोहोळ : शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या मध्यभागीच तीन रांगांमध्ये व्यवसाय थाटल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर वाहनधारक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना बसत आहे.

या मार्गावर दिवसभर मोठी गर्दी होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना मार्ग काढणे कठीण बनले आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हा विलंब जीवघेणा ठरू शकतो, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंसह मध्यभागीही ठिय्या मांडल्याने वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा उरते. परिणामी दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. गर्दीच्या वेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार, एखाद्या चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटून ती गर्दीत घुसल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे.

या समस्येबाबत अनेक सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी नगरपरिषदेकडे लेखी निवेदने देऊन भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी आता मोहोळकरांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news