

मोहोळ : मंगळवारी सकाळी भूकंप झाल्यासारखा मोठ्या गूढ आवाजाने मोहोळ तालुका हादरला. या आवाजाने काहीकाळ नागरिकांत चर्चा आणि भीतीचे वातावरण होते. याबाबत मोहोळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.
मंगळवारी (दि. 10) सकाळी पावणेअकरा वाजता मोहोळ तालुक्यातील काही भागात मोठा हादरवणारा गूढ आवाज झाला. सुरुवातीला काहींना जिलेटीनचा स्फोट झाला असावा असा किंवा काही लोकांना मालट्रक किंवा मोठ्या वाहनाचे टायर फुटल्यासारखा आवाज झाल्याची चर्चा लोकांमध्ये होती. मात्र, हा आवाज तालुक्याच्या बहुतांश गावामध्ये नागरिकांना ऐकायला मिळाला. त्यामुळे हा आवाज जिलेटीनचा स्फोट किंवा टायर फुटल्याचा नसून भूगर्भातील असल्याची चर्चा नागरिक एकमेकांशी भ्रमणध्वनी वरून करत होते. तुमच्याकडे हा आवाज झाला का? अशी विचारणा करत होते. त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा? याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.